Saturday, July 26, 2014

“पूर्वजांकडून मिळालेला वारसा जतन करण्याची गरज” - प्रसिद्ध वास्तुरचनाकार चेतन रायकर


“आपल्या पूर्वजांप्रमाणे भव्यदिव्य आणि मजबूत वाडे, महाल, किल्ले आपण बांधू शकणार नसलो तर निदान त्यांनी आपल्याकडे सोपवलेला हा वारसा जतन तरी केलाच पाहिजे,” असे मत प्रसिद्ध वास्तुरचनाकार व पुरातन वास्तू संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. चेतन रायकर यांनी व्यक्त केले. सांगलीतील आरंभ फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा आरंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. “शंभर-दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान व साधने उपलब्ध नसताना बांधलेल्या भव्य आणि सुंदर वास्तू पाहून, आज आपण अशी निर्मिती का करु शकत नाही, असा प्रश्न पडतो. मग या पुरातन वास्तुंच्या मूळ रचनेला धक्का न लावता तिथे संवर्धन व पुनर्निर्माण करणे अधिकच आव्हानात्मक ठरते,” असे श्री. रायकर म्हणाले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात उध्वस्त झालेल्या मुंबईच्या ताज हॉटेलची पुनर्बांधणी,  पूर्वीचे व्ही.टी. व आताचे सी.एस.टी. या सव्वाशे वर्षे जुन्या वास्तुच्या काना-कोपर्‍यात आढळणारी सुबक कारागिरी, अडीचशे वर्षांपासून फक्त लोड-बेअरिंगवर उभा असणारा इंदोरचा राजवाडा, आणि सिमेंट-काँक्रीटशिवाय नव्याण्णव फूट उंच संगमरवरात बांधलेला हाजी अलीचा मनोरा, अशा अनेक अद्भुत वास्तुंचे दर्शन मल्टीमीडियाच्या माध्यमातून श्री. रायकरांनी सांगलीकरांना घडवले. उत्कृष्ट वास्तुनिर्मिती व काळाच्या पुढचा विचार करुन घडवल्या गेलेल्या इमारतींच्या संदर्भात श्री. रायकर यांनी सांगलीच्या श्री. गणपती मंदीराचा उल्लेख केला. अशा प्रकारच्या पुरातन वास्तू आपल्या आजूबाजूला असूनही आपल्याला त्यांचे महत्त्व लक्षात येत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या वास्तुंचे जतन करण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. “मी ज्या वास्तुच्या संवर्धनाचे वा पुनर्निर्माणाचे काम हाती घेतो, ती वास्तु माझ्याशी बोलते; माझ्या दृष्टीने ती सजीव असते. अशावेळी ताजमहालच्या संगमरवरी भिंतीवर चाकूने ‘पप्पू लव्ह्ज पिंकी’ असे कोरण्याच्या वृत्तीचा भयंकर संताप येतो,” असेही ते म्हणाले. पुरातन वास्तु, किल्ले, मंदीरे यांच्या सौंदर्यास वा रचनेस धक्का पोहोचेल अशी कोणतीही कृती करु नका व इतरही कोणाला करु देऊ नका, असे आवाहन त्यांनी सांगलीकरांना केले. सांगलीतील आर्किटेक्ट, सिव्हील इंजिनियर, बांधकाम व्यावसायिक, तसेच या विषयात रस असणार्‍या नागरिकांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष छायाचित्रे व श्री. रायकरांचे अनुभव कथन यांचा लाभ घेतला. “पुरातन वास्तुंचे महत्त्व, त्यांच्या संवर्धनाची गरज, तसेच हेरिटेज कन्झर्व्हेशन या वेगळ्या क्षेत्रातील संधींची सांगलीकरांना ओळख व्हावी, या हेतुने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्‍या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment