Saturday, July 26, 2014

“शेती हा फायदेशीर व्यवसाय” - कृषि-व्यावसायिक श्री. मकरंद चुरी यांचे प्रतिपादन


“पन्नास-शंभर रुपयांच्या आंब्याच्या कलमापासून तुम्हाला पुढची कित्येक वर्षं शेकडो आंबे देणारं झाड मिळतं. तुम्ही जमिनीत बियाणेरुपी गुंतवणूक करुन घरी झोपलेले असता, तेव्हा तुमचं शेत तुमच्यासाठी काम करत असतं. पिकांची योग्य निवड व शेतीकडं व्यावसायिक दृष्टीकोनातून बघता आलं तर शेती हा सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरु शकतो,” असे मत ‘निसर्ग-निर्माण’ या संस्थेचे तज्ज्ञ श्री. मकरंद चुरी यांनी व्यक्त केले. सांगलीतील आरंभ फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा आरंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. “फाईव्ह-स्टार हॉटेलमधे मिळणार्‍या परदेशी खाद्यपदार्थांसाठी लागणार्‍या एक्झॉटिक भाज्या व फळे पूर्वी आयातच करावी लागत. मात्र, आपल्या जमिनीवर विविध परदेशी भाज्यांच्या उत्पादनाचे प्रयोग करुन आज ऐंशीहून जास्त प्रकारच्या एक्झॉटिक भाज्या व फळे आम्ही स्वतः पिकवतो आणि इच्छुक शेतकर्‍यांना यासंदर्भात मार्गदर्शन करुन व विक्रीची हमी देऊन त्यांच्याकडून वर्षभर उत्पादन करुन घेतो,” असे श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांनी सांगितले. सांगलीच्या भावे नाट्यमंदीरात झालेल्या या कार्यक्रमात श्री. व सौ. चुरी यांनी एक्झॉटिक भाज्या व फळे कोणती, त्यांची बाजारात मागणी किती, त्यांच्या उत्पादनात येणार्‍या अडचणी, त्यावरचे उपाय, आणि या वेगळ्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, या मुद्यांवर सांगलीकरांशी संवाद साधला. शेती करताना, माती परीक्षणापासून शेतीमालाचे मार्केटींग व विक्रीपर्यंत सर्व टप्प्यांवर योग्य मार्गदर्शन व नियोजनामुळे कसा व किती फायदा होते, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणांद्वारे पटवून दिले. पंचवीस वर्षांपासून या कृषि-व्यवसायात काम करणारे श्री. व सौ. चुरी याच विषयावर भारतातील तसेच परदेशातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात. “सांगली परीसरात सर्वसाधारणपणे ऊसाकडे नगदी पिक म्हणून बघितलं जातं. पण एक्झॉटिक भाज्यांची लागवड केल्यापासून पंचेचाळीस दिवसांत विक्रीयोग्य माल तयार होत असल्यानं, हीच खरी कॅश क्रॉप्स आहेत,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी, ‘निसर्ग-निर्माण’चे उत्पादन असलेली काही एक्झॉटिक भाजी व फळेही त्यांनी उपस्थितांना बघण्यासाठी उपलब्ध करुन दिली.

कार्यक्रमास सांगली व परीसरातील प्रयोगशील शेतकरी, तसेच या विषयाबद्दल उत्सुकता असणारे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर, उपस्थितांनी श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. “सांगलीची जमिन व हवा अनेक प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल असली तरी, एक्झॉटिक भाज्यांसारख्या उत्पादनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने, तसेच मार्गदर्शनाच्या अभावामुळे सांगलीतील शेतकरी या क्षेत्रातील संधींपासून वंचित राहिले आहेत. ‘निसर्ग-निर्माण’सारखी संस्था मुंबईत संशोधन करुन मालदीवच्या शेतकर्‍यांना प्रशिक्षण द्यायला जाऊ शकते, तर सांगलीत का येऊ शकणार नाही, अशा विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्‍या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment