सांगली गणेशोत्सव: कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवण्याचा प्रयोग यंदा काही ठिकाणी करण्यात आला. रद्दी कागदाचे बारीक तुकडे करून, शाडू माती आणि डिंक मिसळून, त्याचा लगदा तयार केला जातो. हा लगदा एकजीव झाला की फायबरच्या साच्यात भरला जातो. साधारणपणे एक पूर्ण दिवस साचा तसाच ठेवला जातो. त्यानंतर, मूर्ती सुकवून तिचं रंगकाम सुरू होतं. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे, बादलीभर पाण्यात ही मूर्ती विसर्जित करून ठेवली असता, बारा तासांमध्ये ती पूर्ण विरघळते. हे पाणी मग बागेतल्या झाडांना घालता येतं. अशा प्रकारची मूर्ती शाडूपेक्षा स्वस्त आणि जास्त इको-फ्रेंडली असली तरी ती तयार करण्यात काही अडचणी येतात:
- साचा वापरण्यातल्या मर्यादा: एका साच्यातून एका दिवसात एकच मूर्ती बनवता येते. त्यामुळं जास्तीत जास्त फायबरचे साचे तयार करून घेणं आवश्यक आहे.
- रंगकामासाठी कुशल कारागिरांची गरज: लगदा तयार करणं आणि साच्यात भरणं, या तशा सोप्या गोष्टी आहेत; पण गणपतीच्या मूर्तीचं रंगकाम हा एक अवघड प्रकार मानला जातो. त्यासाठी थोड्या कुशल कामगारांची गरज भासते. असे कारागिर फारसे मिळत नाहीत, आणि मिळाले तर जास्त मजुरी घेतात, ज्यामुळं मूर्तीची किंमत वाढते. यावर एक उपाय म्हणजे, पूर्ण मूर्ती एकाच रंगात रंगवणे. पण, गणपतीच्या मूर्तीची प्रतिमा लोकांच्या मनात अशी वसली आहे की, एकाच रंगातला गणपती, दागिने, शस्त्रं, पीतांबर, या गोष्टी एकाच रंगात पाहणं लोकांना सहज मान्य होणार नाही. दुसरा उपाय अर्थातच कुशल कारागिर शोधणं किंवा तयार करणं.
पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांनी इको-फ्रेंडली मूर्ती बसवाव्यात असं वाटत असेल तर, तशा मूर्ती बाजारात उपलब्ध करून देणंही आवश्यक आहे. यासाठी काम करायचं असेल तर आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे.
मंगलमूर्ती मोरया!
No comments:
Post a Comment