Friday, October 12, 2012

रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणा, महाराष्ट्र राज्य


नोकरीकरीता इच्छुक असलेल्या उमेदवारांना तसेच नोकरी देणार्‍या उद्योजकांना खालील विनामुल्य व पारदर्शक सेवा रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेमार्फत दिल्या जातात:

१. नोकरीकरीता नाव-नोंदणी.
२. नाव-नोंदणी केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, अनुभव व वैयक्तिक सर्व माहिती विचारात घेऊन त्यास योग्य शासकीय/खाजगी नोकरी मिळण्याकरीता सहाय्य.
३. नाव-नोंदणी केलेल्या उमेदवारांस प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा व त्याच्या कौशल्यात वाढ व्हावी याकरिता त्यास खाजगी तसेच निमशासकीय कंपनीत स्टायपेंडसह सहा महिन्याकरीता काम करण्याची संधी.
४. नाव-नोंदणी केलेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी प्राप्त होण्याकरीता यंत्रणेतील अधिकारी यांचा कार्यक्षेत्रातील उद्योजकांना संपर्क व त्यांची नोंदणी, तसेच तत्पर व पारदर्शक सेवा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने पाठपुरावा.
५. उद्योजकांना तात्काळ व योग्य उमेदवार मिळण्याकरीता प्रत्यक्ष कार्यालयात 'स्पॉट रिक्रुटमेंट'ची सुविधा.
६. स्वयंरोजगारास इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगाराच्या विविध योजना, नवनवीन व्यवसायाच्या संधी व प्रशिक्षण कार्यक्रम.
७. नाव-नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रात, तसेच स्पर्धा परिक्षेद्वारे करियर घडविण्याकरीता माहिती व मार्गदर्शन सुविधा.

जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या माध्यमातून वरील सुविधांचा लाभ सांगली परीसरातील उमेदवारांना व उद्योजकांना मिळावा, यासाठी 'आरंभ फाउंडेशन' काम करीत आहे. याबाबतच्या सूचना अथवा सहभागासाठी संपर्क कराः

राहुल बिरनाळे ७६२०१०२०३०
मंदार शिंदे ९८२२४०१२४६

Tuesday, October 9, 2012

विधायक उपक्रमांची आखणी

सांगलीतील गणेशोत्सवाबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी, तसंच उत्सवानिमित्त प्रकट होणारी सामूहिक ऊर्जा शहराच्या प्रगतीसाठी वापरता यावी, यासाठी 'आरंभ फाउंडेशन'नं विधायक गणेशोत्सवाचा उपक्रम हाती घेतला होता. यासाठी शहरातल्या काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून, शांततामय व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल चर्चा करण्यात आली. 'आरंभ'च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काही मंडळांनी पुढच्या वर्षी तर काहींनी याच वर्षी बदलाची तयारी दाखवली. गणेशमूर्तीचा आकार कमी करणं, पीओपी ऐवजी शाडूची मूर्ती बसवणं, मिरवणूक रद्द करून उर्वरीत वर्गणीचा सदुपयोग करणं, मिरवणूक असेलच तर ती शांततामय पद्धतीनं काढणं, आपल्या भागातल्या नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रमांचं आयोजन करणं, सामाजिक प्रश्नांबद्दल प्रबोधन करणं, अशा विविध प्रकारे मंडळांनी आपला सहभाग नोंदवला. याच सामूहिक उत्साहातून वर्षभर विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आता एकत्र बसून पुढच्या उपक्रमांची आखणी करायची आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी काहीतरी करायची इच्छा असणार्‍यांनी जरूर सहभागी व्हावं.

Sunday, September 30, 2012

बदलाची तयारी

सांगलीच्या ग्रीन एफएम (९०.४) वर 'आरंभ फाउंडेशन'चं आवाहन ऐकून, कोल्हापूर जिल्ह्यातूनही फोन आले. एका मंडळानं गणपतीची दहा फुटी मूर्ती बसवली होती. एवढ्या मोठ्या मूर्तीचं आणि निर्माल्याचं नदीतच विसर्जन करतात. मूर्तीच्या आकाराबद्दल आणि पीओपी न वापरण्याबद्दल चर्चा करताना मंडळाच्या कार्यकर्त्यानं सांगितलं, "गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच उत्सवाचं नियोजन आमच्याकडं आलंय. त्याआधी सगळे निर्णय वडीलधारी मंडळी घ्यायची. पेपरमध्ये वाचून आम्हाला पण काहीतरी चांगले बदल करावंसं वाटू लागलंय. मागच्या दोन वर्षांपासून डॉल्बी पूर्ण बंद आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत दांडपट्ट्याचा खेळ ठेवला होता. आमचं गाव छोटं आहे. गावातल्याच भजनी मंडळाला बोलवून, एखाद्या सामाजिक विषयावर प्रवचन द्या असं सांगितलं. पीओपीच्या मूर्तीमुळं नुकसान होतं असं पेपरमध्ये वाचलं होतं, पण तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर नक्की काय करायचं ते कळलं. गावातल्या जुन्या माणसांना समजावणं जरा अवघड आहे, पण गावकर्‍यांच्याच फायद्याची गोष्ट असेल तर आम्ही नक्की प्रयत्‍न करू. निर्माल्याचा तुमचा मुद्दा एकदम पटला. आता आपापल्या अंगणातल्या झाडांनाच निर्माल्य घालायला सांगतो सगळ्यांना. रेडीओवर तुमचं आवाहन ऐकलं.. नुकसान तर काय होणार नाही, झाला तर फायदाच होईल, असं वाटलं, म्हणून फोन लावला बघा."

Friday, September 28, 2012

गणेशोत्सवाचं बदलतं रूप

सांगली गणेशोत्सव (विसर्जन): नवव्या दिवशी विसर्जनात ढोल पथकांचा जोर दिसला. एका-एका मंडळासमोर चार-चार पथकं होती. कालच्या विसर्जनाला मोठ्या मूर्तींची संख्या जास्त होती. एका मंडळाच्या मिरवणुकीत, ट्रॉलीमध्ये छोटी कडुनिंबाची वगैरे रोपं घेऊन कार्यकर्ते बसले होते. रस्त्यावरून जाताना सगळ्यांच्या हातात एक-एक रोप देऊन पुढं जात होते. ढोल आणि मोरयाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. डॉल्बी बंदीबरोबरच सिनेमातली गाणी आणि त्यावरचे हिडीस नाच आपोआप बंद झालेत. शिवाय, यंदाच्या उत्सवात दिवसभर सगळ्या मंडळांनी मंडपाबाहेर शांतता राखणं पसंत केलं. रात्री आरती आणि देखाव्याच्या वेळीच काय ते स्पिकर लावले जात होते. कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं गणेशोत्सवाचं रूप बदलून दाखवायचं ठरवलंय जणू... मोरया!

Thursday, September 27, 2012

इको-फ्रेंडली गणेशमूर्ती

सांगली गणेशोत्सव: कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवण्याचा प्रयोग यंदा काही ठिकाणी करण्यात आला. रद्दी कागदाचे बारीक तुकडे करून, शाडू माती आणि डिंक मिसळून, त्याचा लगदा तयार केला जातो. हा लगदा एकजीव झाला की फायबरच्या साच्यात भरला जातो. साधारणपणे एक पूर्ण दिवस साचा तसाच ठेवला जातो. त्यानंतर, मूर्ती सुकवून तिचं रंगकाम सुरू होतं. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे, बादलीभर पाण्यात ही मूर्ती विसर्जित करून ठेवली असता, बारा तासांमध्ये ती पूर्ण विरघळते. हे पाणी मग बागेतल्या झाडांना घालता येतं. अशा प्रकारची मूर्ती शाडूपेक्षा स्वस्त आणि जास्त इको-फ्रेंडली असली तरी ती तयार करण्यात काही अडचणी येतात:

- साचा वापरण्यातल्या मर्यादा: एका साच्यातून एका दिवसात एकच मूर्ती बनवता येते. त्यामुळं जास्तीत जास्त फायबरचे साचे तयार करून घेणं आवश्यक आहे.
- रंगकामासाठी कुशल कारागिरांची गरज: लगदा तयार करणं आणि साच्यात भरणं, या तशा सोप्या गोष्टी आहेत; पण गणपतीच्या मूर्तीचं रंगकाम हा एक अवघड प्रकार मानला जातो. त्यासाठी थोड्या कुशल कामगारांची गरज भासते. असे कारागिर फारसे मिळत नाहीत, आणि मिळाले तर जास्त मजुरी घेतात, ज्यामुळं मूर्तीची किंमत वाढते. यावर एक उपाय म्हणजे, पूर्ण मूर्ती एकाच रंगात रंगवणे. पण, गणपतीच्या मूर्तीची प्रतिमा लोकांच्या मनात अशी वसली आहे की, एकाच रंगातला गणपती, दागिने, शस्त्रं, पीतांबर, या गोष्टी एकाच रंगात पाहणं लोकांना सहज मान्य होणार नाही. दुसरा उपाय अर्थातच कुशल कारागिर शोधणं किंवा तयार करणं.

पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांनी इको-फ्रेंडली मूर्ती बसवाव्यात असं वाटत असेल तर, तशा मूर्ती बाजारात उपलब्ध करून देणंही आवश्यक आहे. यासाठी काम करायचं असेल तर आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे.

मंगलमूर्ती मोरया!

Wednesday, September 26, 2012

आशादायी गणेशोत्सव

सांगली गणेशोत्सव: यंदा डॉल्बी बंदीमुळं कित्येक मंडळांनी विसर्जन मिरवणुकाच रद्द केल्या आहेत. ज्या मंडळांच्या मिरवणुका आहेत, त्यांनी ढोल, झांज, बँजो, आणि रोषणाईवर भर दिलाय.

- एक मोठी कायमस्वरुपी मूर्ती आणि एक छोटी उत्सवमूर्ती अशी प्रथा काही मंडळांनी सुरु केली आहे. मोठी मूर्ती वर्षभर कुणाच्या तरी घरी किंवा मंदीरात ठेवली जाते. गणेश चतुर्थीला छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या छोट्या मूर्तीचं विसर्जन करणं सोपं असतं. आता ही छोटी मूर्ती शाडूची किंवा कागदाच्या लगद्याची घेतली जावी, एवढंच बघायचं.
- विसर्जन घाटावर निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेनं जय्यत तयारी ठेवलीय. काल सातव्या दिवशीच्या विसर्जनासाठी, निर्माल्य कुंडाजवळ सतत महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक थांबून होते. विसर्जनासाठी आलेल्या प्रत्येकाला थांबवून निर्माल्य नदीत न टाकण्याची विनंती करत होते. शिवाय, निर्माल्य कुंडात टाकण्यापूर्वी प्लॅस्टीकच्या पिशव्या काढून घेण्याचंही काम सुरु होतं.
- मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून मंडळांनी, कायमस्वरुपी मंदीराचं बांधकाम, मूर्तीला चांदीचे दागिने, काही हजार लोकांसाठी महाप्रसाद, अशा प्रकारचे उपक्रम सुरु केले आहेत. अजून विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमांबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे. जितक्या मंडळांशी आम्ही चर्चा केली, त्या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता एकत्र बसून काही
उपक्रमांची आखणी करायची आहे.

गणपती बाप्पा मोरया!

Monday, September 24, 2012

गणेशोत्सवातल्या सुटलेल्या समस्या


काल पाचव्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं. काल आढळलेल्या काही गोष्टी:

- एकाही सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजला नाही! ढोल, ताशा, लेझीम, झांज, बँजो, आणि 'मोरया मोरया'चा गजर...
- निर्माल्य नदीत टाकलं जाऊ नये, यासाठी बरेच स्वयंसेवक विसर्जनस्थळी तैनात होते. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि बहुतांश घरगुती गणपती घेऊन आलेले लोक निर्माल्य कुंडांचा वापर करताना दिसले. शिवाय, महापालिकेचे कर्मचारी निर्माल्य प्लॅस्टीकच्या पिशव्यांमधून काढून कुंडात टाकण्याचं काम करत होते.
- विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विसर्जनासाठी नदीऐवजी कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर! सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेनं काही ठिकाणी निर्माल्य कलश आणि कृत्रिम टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या-त्या परिसरातल्या नागरिकांनी या कृत्रिम टाक्यांमध्ये विसर्जन केलं.

गणेशोत्सवादरम्यान होणारं सर्व प्रकारचं प्रदूषण आणि त्यावरचे उपाय, यांबद्दल लोकांमध्ये चांगलं प्रबोधन होतंय आणि होईल, याची खात्री पटण्यासारखी परिस्थिती दिसतेय.

Sunday, September 23, 2012

विधायक गणेशोत्सवाच्या दिशेने वाटचाल


पर्यावरणास कमीत कमी धोका पोचवून उत्सव साजरा करण्याइतकी जाणीव गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होताना दिसतीय.

- बहुतेक सर्व मंडळं निर्माल्य नदीत न टाकता निर्माल्य कुंडातच टाकतायत.
- काही मंडळं गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीशिवाय करतायत.
- काही मंडळांनी स्वतःहून रस्त्यात खड्डे खणून मंडप घालणं बंद केलं असून, आता ते सार्वजनिक मोकळ्या जागेवर किंवा कॉलनीतल्या रिकाम्या प्लॉटवर गणपती बसवतायत.
- काही मंडळांनी भव्य देखावे आणि विद्युत रोषणाईला फाटा देऊन, परिसरातल्या लोकांसाठी मनोरंजक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलंय.

विधायक गणेशोत्सवाच्या दिशेनं चालताना, आधी नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होणं आवश्यक आहे. हे सगळे बदल बघून विधायक गणेशोत्सवाबद्दल जास्त विश्वास वाटू लागलाय.

Saturday, September 22, 2012

शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरीस


शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींमधला फरक स्पष्ट नसल्याचं काही मंडळांशी बोलताना जाणवलं. काही महत्त्वाचे फरक म्हणजे -

- शाडूच्या मूर्तीचा आकार लहान असतो आणि वजन जास्त असतं. पाच-सहा फुटी (किंवा त्याहून मोठी) मूर्ती नक्कीच शाडूची नसणार.
- शाडूच्या मूर्तीमध्ये फार नाजूक कलाकुसर करता येत नाही. पीओपीची मूर्ती तुलनेनं फार सुबक दिसते.
- शाडूची रंगवलेली मूर्ती शक्यतो मॅट फिनिशमध्ये येते. जास्त ग्लॉसी रंगवलेली मूर्ती पीओपीची असण्याची शक्यता जास्त असते.
- पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळत नाही, तिचे तुकडे पडतात. याउलट शाडूची (नैसर्गिक रंगांत रंगवलेली) मूर्ती पाण्यात विरघळून चिखल तयार होतो, जो बागेतल्या झाडांनाही घालता येतो.

जाणकारांनी याविषयी अधिक माहिती पुरवावी, तसंच आजूबाजूच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी.


Thursday, September 20, 2012

शांततामय गणेशोत्सव


काल सांगलीतल्या एकाही मिरवणुकीत डॉल्बी नव्हता. पारंपारिक वाद्यं, ढोल-ताशा, लेझीम, झांज, बँजो...आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशभक़्तांचा 'मोरया'चा गजर!

"आज कित्येक वर्षांनी गजाननाचं आगमन सुसह्य वाटलं," असं काही ज्येष्ठांनी बोलून दाखवलं.

"बाप्पांच्या घोषणा देऊन घसा बसला पण मन मोकळं झालं," असं मंडळांचे कार्यकर्ते म्हणाले.

"कोण रांडचा डॉल्बी बंद करतोय बघूच," असं उत्सवापूर्वी म्हणणारे काल शांतपणे आपापल्या मंडळांच्या मंडपात बसून होते.

फक़्त पोलिसांनी सक़्ती केली म्हणून डॉल्बी एका वर्षात बंद झाला असं म्हणता येणार नाही. लोकांचाही त्याला अंतर्गत विरोध होताच. काही गोष्टींची सुरुवात सक़्तीनं करावी लागली तरी, लोकसहभागातून त्यांची ताबडतोब अंमलबजावणी होऊ शकते, नाही का?

शांततामय गणेशोत्सवाच्या समस्त सांगलीकरांना शुभेच्छा!


Tuesday, September 18, 2012

श्रद्धा मोठी असली म्हणजे झालं...

सांगलीतल्या एका मंडळाच्या कार्यकर्त्यांना काल भेटलो. मंडळाचं पंचविसावं वर्ष असल्यानं मोठ्ठी मूर्ती ठरवलीय, अर्थातच प्लास्टर ऑफ पॅरीसची. विसर्जनानंतर ही मूर्ती विरघळणार नाही, उलट तिचे तुकडे-तुकडे होतील, याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. नऊ दिवस ज्या गजाननाची मनोभावे पूजा करायची, त्याच्या अशा विटंबनेला आपण जबाबदार ठरायचं का, यावर कार्यकर्त्यांनी विचार केला. यंदाची मूर्ती बदलता येणार नाही, पण पुढच्या वर्षीपासून नक्की शाडूची मूर्ती आणू, असं मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं. "मूर्ती मोठ्ठी असलीच पाहिजे असं नाही, श्रद्धा मोठी असली म्हणजे झालं," असं शेवटी अध्यक्ष म्हणाले. मंगलमूर्ती मोरया!

Monday, September 17, 2012

सांगलीच्या गणेशोत्सवात तरुणाईचे योगदान


सार्वजनिक गणेशोत्सव आणि गणेश मंडळांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तयार झालेलं नकारात्मक चित्र बदलण्यासाठी आणि उत्सवानिमित्त प्रगट होणारी ऊर्जा विधायक कार्यांकडं वळवण्यासाठी सांगलीची तरुणाई पुढे सरसावली आहे. 'आरंभ फाउंडेशन' या सांगलीतल्या उत्साही व सकारात्मक विचारांच्या युवा संघटनेनं गणेशोत्सवाकडं विधायक आणि विकासात्मक दृष्टीनं पाहण्याचं आवाहन समस्त सांगलीकरांना केलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळं फक्‍त वर्गणी गोळा करतात, मांडव घालून रस्ते अडवतात, आणि मिरवणुकीत दंगा घालतात, असा सरसकट शिक्का सगळ्या मंडळांवर मारला जातो. पण प्रत्यक्षात कित्येक लहान-मोठी मंडळं आपापल्या परीसरात चांगले कार्यक्रम व्हावेत, यासाठी प्रयत्‍न करीत असतात. कित्येकदा चांगले पर्याय, योग्य मार्गदर्शन, आवश्यक निधी व मनुष्यबळ यांच्या अभावामुळं अशा मंडळांचं काम खूपच मर्यादीत राहतं. शिवाय, वाईट व नकारात्मक गोष्टींच्या प्रसिद्धीपुढं छोट्या-छोट्या मंडळांचं काम अज्ञातच राहतं. खरं पाहता, गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे त्या-त्या भागाचे कृतीशील रहिवाशी असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि चांगले पर्याय उपलब्ध करून दिले तर, स्थानिक पातळीवर प्रबोधन आणि विकास साधणं सहज शक्य होईल. याच भावनेतून, 'आरंभ'चे तरुण सांगलीतल्या गणेशमंडळांशी संपर्क साधत आहेत. प्रत्यक्ष भेटून मंडळांच्या कार्याची माहिती घेणं, सर्व प्रकारचं प्रदूषण टाळण्यासाठी करता येणार्‍या उपायांची चर्चा करणं, पारंपारिक व विधायक गणेशोत्सवाबद्दल मंडळांच्या कल्पना जाणून घेणं व अभिनव कल्पना सुचवणं, अशा प्रकारचं काम 'आरंभ' करीत आहे. आतापर्यंत भेटलेल्या मंडळांनी या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला असून, मिरवणुकीशिवाय विसर्जन, डॉल्बीमुक्‍त मिरवणूक, निर्माल्यकुंडांचा वापर, तसंच कार्यक्रम आणि मिरवणुकीतून समाज प्रबोधन या माध्यमातून 'विधायक गणेशोत्सव' साजरा करण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, कार्यकर्तांचा उत्साह व ऊर्जा गणेशोत्सवापुरती मर्यादीत न ठेवता, आपल्या परिसराच्या व शहराच्या विकासासाठी वर्षभर कार्यरत राहण्याचा संकल्पही काही मंडळांनी केला आहे. विधायक कार्यात योगदान देऊ इच्छिणार्‍या मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीतील सेवाभावी संस्था व प्रशासनाने या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठीही 'आरंभ' प्रयत्‍न करीत आहे. त्यासाठी विविध संस्थांना भेटून त्यांच्या कार्याची माहिती घेतली जात आहे. गणेश मंडळ व अशा संस्थांना एकत्रित आणून चांगल्या उपक्रमांची आखणी करणं, गणेशोत्सवातील कार्यक्रम व मिरवणुकीच्या निमित्तानं एकत्र येणार्‍या सांगलीकरांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणं, हे 'आरंभ'चं उद्दिष्ट आहे. आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची आखणी 'आरंभ'च्या युवकांनी केली आहे. आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता -

गणेश मंडळाचे कार्यकर्ते असाल तर, आपल्या मंडळाची 'आरंभ विधायक गणेशोत्सव' उपक्रमात नोंदणी करा;
कोणत्याही सेवाभावी संस्थेशी संबंधित असाल तर, संस्थेच्या कार्याची माहिती 'आरंभ'कडे पाठवा;
मनोरंजक व प्रबोधनपर कार्यक्रम घेत असाल, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवत असाल, देखावे व कार्यक्रमांबद्दल आपल्याकडं काही अभिनव कल्पना असतील तर, आपली माहिती 'आरंभ'कडे पाठवा;
आपला बहुमूल्य वेळ देऊन प्रत्यक्ष काम करण्याची तयारी असेल तर, 'आरंभ फाउंडेशन'ला संपर्क करा -

राहुल बिरनाळे - ७६२०१०२०३०
मंदार शिंदे - ९८२२४०१२४६

विधायक गणेशोत्सव

‎'आरंभ'ची बातमी वाचून जत तालुक्यातून फोन आले. दुष्काळी परिस्थितीमुळं गणेशोत्सव साधेपणानं साजरा करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. मोठमोठ्या मूर्तींची ने-आण करण्यातल्या अडचणी आणि विसर्जनानंतरची दुर्दशा यांबद्दल गावांमधून बरंच विचारमंथन होतंय. दरवर्षी मूर्तीचा आकार कमी करत यंदा दोन फुटी मूर्तीच ठरवली आहे. पुढच्या वर्षी शाडूच्या मातीचीच मूर्ती आणणार असल्याचं कार्यकर्तांनी फोनवर आवर्जून सांगितलं. शिवाय, डॉल्बीला पूर्णपणे फाटा देऊन यंदा गावातल्या मंदिराचं पारंपारिक ढोलपथक मिरवणुकीसाठी ठरवलंय...

Sunday, August 19, 2012

सांस्कृतिक आणि शांततामय गणेशोत्सव


उद्दिष्टेः
१. गणेशोत्सवाचे सांस्कृतिक स्वरूप टिकवून ठेवणे.
२. गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकवारसा जपणे.
३. उत्सवातील हिडीसपणा व उपद्रव कमी करणे.
४. नागरिकांमध्ये सामाजिक जाणीवा जागृत करणे.

सहभागी घटकः
१. गणेशोत्सव मंडळे
२. सांगली पोलिस व प्रशासन
३. सामाजिक कार्य करणार्‍या सेवाभावी संस्था
४. प्रसारमाध्यमे
५. आरंभ फाउंडेशन

कार्यक्रमाची आखणीः
प्रत्येक गणेशोत्सव मंडळाची स्वतंत्र मिरवणूक काढल्यास अनियोजनामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. मंडळांच्या आपसातील स्पर्धेमुळे धोकादायक प्रसंग ओढवू शकतात. तसेच, स्वतंत्र मिरवणुकीसाठी प्रत्येक मंडळाकडे पुरेसा निधी नसल्यास आर्थिक मर्यादा येतात. वेगवेगळ्या गणेश मंडळांची एकत्र मिरवणूक काढल्यास, वेळ आणि पैसे वाचतील, उत्तम प्रकारे मिरवणुकीचे कार्यक्रम घेता येतील, समाज-प्रबोधनासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल. तसेच, विधायक उपक्रमांना प्रोत्साहनही देता येईल.

१. विसर्जन मिरवणूक -
अ) पारंपारिक वाद्यांची पथके - ढोल पथक, झांज पथक, लेझीम पथक, धनगर ढोल, इ.
ब) वारकरी पथक, प्रबोधनात्मक पोवाडा, पथनाट्य/लोकनाट्य, इ.
क) सामाजिक विषयांवर आधारित बॅनर, पोस्टर, कमान, इ.

२. विधायक उपक्रम -
अ) सहभागी गणेशोत्सव मंडळे निर्माल्य नदीत टाकणार नाहीत याची खात्री करणे.
ब) पर्यावरणाचा विचार करून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्या न घेण्याबद्दल प्रबोधन करणे.
क) भयंकर ध्वनिप्रदूषण करणार्‍या डॉल्बी सिस्टीमला मिरवणुकीतून व उत्सवातून हद्दपार करणे.
ड) विसर्जन मिरवणूक व पर्यायाने गणेशोत्सव व्यसनमुक्त / दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे.

आवाहनः
आपल्या सांगली नगरीचे आराध्य दैवत - श्रीगणेशाचा उत्सव सुसंस्कृत व विधायक मार्गाने पार पाडण्यासाठी वरील सर्व घटकांनी एकत्र यावे, असे आवाहन 'आरंभ फाउंडेशन' करीत आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क कराः

राहुल बिरनाळे - ९३२५६०२०३०
मंदार शिंदे - ९८२२४०१२४६

Thursday, August 16, 2012

चला, आज काहीतरी चांगले करुया...

दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, आजारपण, या एका दिवसात सुटणार्‍या समस्या नाहीत. आर्थिक आणि सामाजिक असमतोल मिटवणे, हेदेखील कठीण काम आहे. पण म्हणजे आपण काहीच करु शकत नाही का? नक्कीच करु शकतो. आपल्यातील प्रत्येकजण काहीतरी करु शकतो. गरज आहे ती सुरुवात करण्याची...आरंभ करण्याची! याच भावनेतून सांगलीतल्या काही उत्साही तरुणांनी आपल्या सामाजिक योगदानाचा आरंभ केला, १५ ऑगस्ट या शुभदिवशी. ‘आरंभ फाउंडेशन’ या नावाने सांगलीतील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या परीने बदल घडवण्याचा संकल्प या स्वातंत्र्यदिनी सोडला आहे. समाजातील गरजूंना मदत, सांगली परिसरातील युवकांसाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न, तसेच शैक्षणिक व वैद्यकीय सहाय्यासाठी ‘आरंभ फाउंडेशन’ काम करणार आहे. संस्थेच्या कामाची सुरुवात, गरजूंसाठी जुने कपडे दान करण्याच्या मोहिमेतून करण्यात येत आहे. सांगलीकरांना जुने व वापरात नसलेले कपडे दान करण्याचे आवाहन करून, स्त्री-पुरुष व मुलांचे सुमारे २०० हून अधिक कपडे गोळा करण्यात आले. यापैकी चांगले, न फाटलेले, व स्वच्छ कपडे निवडून गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी ‘आरंभ’चे कार्यकर्ते काम करीत आहेत




Tuesday, August 7, 2012

Let us 'aarambh'...

Poverty, Hunger, Malnutrition...all of us know what the problems are. But what are the solutions? Sharing such photos on Facebook? Criticising the Government in Facebook status updates? Writing STRONG comments below such posts? We don't think so...

We believe in getting on the real grounds, not just on FB walls. We believe in connecting with humans, not just online profiles. We know we may not have 'the ultimate' solution. But we also know that we have 'some' solution!

This Independence Day, let us connect with real humans, let us exchange thoughts and actions, let us start...let us 'aarambh'! Join us in getting back to the roots. Join this initiative by Indians, for Indians! Jai Hind!

Sunday, July 1, 2012

Aarambh - The Beginning...

The objective of Aarambh Foundation is to channelize resources from society, and energy of youth from Sangli area. True to its name, 'Aarambh' plans 'to initiate' development and constructive activities in Sangli, with the help of people from Sangli. Aarambh wants to address the issues of today's youth - from education to employment, from family to government, from environment to technology. And all this can be done through participation by all stakeholders of the society - schools, colleges, companies, government, media, families, and individuals. Aarambh plans to bring all of them together, and utilize the resources and energy for their own development and growth.